Saturday, August 18, 2012

हार्ड रॉक कॅफे (१)

शाळेत असल्यापासून इंग्रजी गाणी ऐकत आलो आहे. अगदी सुरूवातीला ऍबा (ABBA), बोनी-एम (BoneyM) या पॉप बॅण्ड्सपासून सुरूवात करून आता हार्ड रॉक, अल्ट-रॉक (alt-rock) वगैरे रॉकचे प्रकार असा श्रवणप्रवास आहे. मला आवडणार्‍या रॉक संगीतकारांबद्दल थोडे लिहिणार आहे. कालानुक्रमाने लिहिण्याचा उद्देश नाही. तसा आढळलाच तर तो योगायोग. 

साठीचा काळ म्हणजे साऱ्या जगभरातला राजकीय चळवळींचा काळ होता. अमेरिकेत 'फ्लॉवर पॉवर' उदयाला येत होती. कृष्णवर्णीय त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडत होते, शीतयुद्ध जोरात होते, तरूण पिढी प्रचंड अस्वस्थ होती, चळवळी होती. गिन्सबर्गसारखे बीट-कवी तरूणांना चेतवत होते. त्यातून 'काउंटरकल्चर' निर्माण झाले.
पीटर, पॉल अँड मेरी हा साठीच्या दशकातला एक खूप गाजलेला ग्रुप. या त्रिकूटाने इफ आय हॅड अ हॅमर हे गाणे गायले. स्थळ होते वॉशिंग्टन डीसी आणि वेळ होती मार्टीन ल्युथर किंग ज्यु. यांच्या 'मार्च ऑन वॉशिंग्टन'ची. तोच तो मोर्चा जेव्हा किंगने 'आय हॅव अ ड्रीम' हे भाषण केले. अगदी कमीत कमी वाद्यरचना, एकमेकांत मिसळून जाणारे आवाज, लोकसंगीताचा बाज असलेले संगीत आणि समजायला अतिशय सोपी, साधी पण सामाजिक आशय असलेली गाणी हे तिघे गात होते. साहजिकच ही गाणी गुणगुणायला सोपी आहेत आणि मला फार आवडतात. मेरीची गाणी ऐकली की ती घायकुतीला आलेली वाटते आणि तेच तिच्या आवाजाचे वैशिष्ट्य होते. त्या काळच्या परिस्थितीला आणि गाण्यांना चपखल बसेल असा तिचा आवाज होता. व्हेअर हॅव ऑल द फ्लॉवर्स गॉन ? या गाण्यातून साध्या शब्दांत मोठा आशय सांगितला आहे. मुख्य म्हणजे या क्लिपमध्ये दिसते तसे हे तिघेजण नेहमीच श्रोत्यांना सहभागी करून घ्यायचे. लोकांना व्यवस्थित पुढच्या ओळी सांगून वगैरे.
पफ द मॅजिक ड्रॅगन हे म्हटले तर बालगीत आणि म्हटले तर मोठ्यांसाठीचे गाणे. वाढत्या वयाबरोबर निरागसता निघून जाते, त्यावर हे सुंदरसे गाणे आहे. पण लोकांना हे गाणे ड्रग्ज घेण्याविषयी आहे असे वाटले. त्यावरून बरीच टीका व वादंग झाला. शेवटी पीटर यारोला स्पष्टीकरण द्यावे लागले.
पफ द मॅजिक ड्रॅगन
बाकी त्यांची बॉब डिलनची कव्हर्स (दुसर्‍या गायकाचे मूळ गाणे आपण आपल्या पद्धतीने गायचे) आणि ’लिव्हिंग ऑन अ जेटप्लेन’ हे छान आहेत (जेटप्लेनचे मला आवडणारे कव्हर वेगळ्या बाईचे आहे, त्यावर नंतर.) पण तरी मला हीच ३ सर्वात जास्त आवडतात.

याच काळात रॉकसंगीताच्या मुळांकडे वळायला लावणारा आणखी एक ग्रुप आला. त्याचे नाव होते क्रीडेन्स क्लिअरवॉटर रिवायव्हल (Creedence Clearwater Revival). हे लोक मूळचे बे-एरिआतले (San Francisco) होते. म्हणजे जवळच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निआ, बर्कलीसारखा खदखदता ज्वालामुखी होता. या विद्यापिठात नवनवीन चळवळी उदयाला येत होत्या, इथले विद्यार्थी त्यांच्या आचारविचारांद्वारे सातत्याने समाज घुसळून टाकत होते, त्याव्यतिरिक्त कॅलिफोर्निआच्या बे-एरिआतल्या तत्कालिन लोकप्रिय गोष्टी वगैरेंचा परिणाम न होऊ देता त्यांनी लोकांना रूट्स-रॉककडे (रॉक संगीताची मुळे) वळवले आणि धमाल केली.
प्राउड मेरी, बॅड मून रायजिंग, फॉर्च्युनेट सन आणि लूकिन आउट माय बॅकडोअर ही त्यांची मला आवडलेली गाणी. त्यातही लूकिन आउट जरा जास्त आवडते (’बिग लेबोव्स्की’चा परिणाम!) शिवाय त्यात शेवटी 'सॉरो'च्या लायनीला टेम्पो बदलतो तेही मस्त. फॉर्च्युनेट सनच्या सुरूवातीच्या कॉर्ड्स ओळखीच्या वाटतात. का ते कळत नाही. पण ठेका मस्त आहे आणि परत, साधी सोपी गाणी. टिपिकल सदर्न. त्यामुळे imagination sets in, pretty soon I'm singin' हे अगदी खरे! ’बिग लेबोव्स्की’मधल्या ड्यूडची गाडी चोरीला जाते, तेव्हा तो पोलिसांकडे तक्रार नोंदवताना गाडीतल्या CCR च्या कॅसेटचा उल्लेख करतो. CCR त्याचा आवडता बँड असतो. यावरून CCR चे महत्त्व कळून येईल.

साठीचे दशक हा फारच रोचक काळ होता. एकीकडे ’सायकेडेलिक रॉक’(psychedelic rcok) म्हणजे आमच्यातुमच्या भाषेत ’हिप्पी लोकांचे संगीत’ निर्माण झाले, तर दुसरीकडे सांगितिकदृष्ट्या त्याच्या दुसर्‍या टोकाला असलेले फोक-रॉक (folk rock) संगीत, ज्याला ब्लूज, कंट्री अशा 'पारंपरिक' संगीताचा पाया होता. सायकेडेलिक रॉकचे गाजलेले बॅन्ड्स म्हणजे ग्रेटफुल डेड (Grateful Dead), जेफर्सन एअरप्लेन (Jefferson Airplane), बिग ब्रदर अँड होल्डिंग कंपनी (Big Brother and Holding Company) इ. हा प्रकार नक्की काय असतो यासाठी उदाहरणे - जेफर्सन एअरप्लेनचे समबडी टु लव्ह व व्हाइट रॅबिट . सायकेडेलिआमध्ये गिटारच्या साथीला सिंथ आला, अकॉस्टिकबरोबर इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर वाढला. सतारीसारखी 'महारिषी' (Maharishi) वाद्ये आली आणि त्याचबरोबर कोकेन, गांजा आणि खुली लैंगिकता हे सायकेडेलिआचा अविभाज्य आणि प्रमुख भाग बनले. सायकेडेलिआ ही फक्त ऐकायची नाही तर अनुभवण्याची चीज झाली.

अशा धुमशानीमध्ये फोक रॉकमध्ये एक सायकेडेलिक बाई आली - जेनिस जॉप्लिन (Janis Joplin) आणि रॉकमधले स्त्रीचे स्थान वगैरे विद्वत्तापूर्ण गोष्टींवर चर्चा करण्याची उत्तम सोय झाली. त्या चर्चेत तिच्याकडे आमच्यासारख्यांना हक्काने बोट दाखवता येऊ लागले. जेनिसने फोकरॉकमध्ये जबरी चैतन्य आणले. आवाजात थोडी खरखर आणि तारूण्यसुलभ जोषाने गायलेली गाणी असा तिचा खास अंदाज होता. ती आधी वर उल्लेख केलेल्या बिग ब्रदर बॅन्डचा भाग होती. नंतर तिने एकटीने गायला सुरूवात केली.
तिची मी एँड बॉबी मगी (Me and Bobby McGee), समरटाइम मला खूप आवडतात. 'बॉबी मगी' गाणे क्रिस क्रिस्टोफरसने (तिचा त्यावेळचा बॉयफ़्रेन्ड) लिहिले आहे. क्रिसचे नाव कंट्री म्युझिकमध्ये खूप वरचे आहे. 'समरटाईम' ऐकताना असे वाटते की ती खूप किंचाळत आहे. तसा आरोपही तिच्यावर झाला. पण त्या संपूर्ण गाण्याचा परिणाम सॉलिडच आहे. त्यातले काही गिटारवादनाचे भाग खूपच ओळखीचे वाटतात, कारण ते किंवा त्यावर आधारीत संगीत अनेक ठिकाणी वापरले गेले आहे. नशील्या औषधांच्या अतिसेवनामुळे जेनिस तरुणपणीच गेली. तिने निधनापूर्वी एक अल्बम तयार केला होता. ती गेल्यावर तो प्रकाशित झाला. बॉबी मगी त्यातच होते आणि ते गाणे चार्टटॉपर झाले.
शेवटी तिच्या मर्सेडिज बेन्झ गाण्याचा उल्लेख केला पाहिजे. तसे पाहिले तर हे रॉक नाही. पण तिचा खट्याळपणा सतत जाणवत राहतो आणि अशी गायिका तिची क्षमता पुरेपूर दिसण्याआधीच गेली याची चुटपुट लागते.

No comments:

Post a Comment